मुंबईतीलघाटकोपर परिसरात घर दुरूस्तीदरम्यान अंगावर भिंत कोसळल्याने एका ४५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घाटकोपर येथील नारायण नगर परिसरात बुधवारी (१६ जुलै २०२५) दुपारी घडली. जावेद अझिझ खान असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गोंदिया हॉल आणि गौसिया मशिदीजवळ एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास अझिझच्या अंगावर भिंत कोसळली आणि तो ढिगाऱ्याखाली अडकला. घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी ताबडतोब अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अझिझला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर अझिझला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.