लॉकडाऊन कालावधीत मुंबई विमानतळावरुन ३७०० प्रवाशांची जगभरात रवानगी, आयात निर्यातीचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:48 IST2020-04-15T18:47:54+5:302020-04-15T18:48:21+5:30
लॉकडाऊनमधील २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत जगभरातील विविध देशांतील भारतात अडकलेल्या ३७०० प्रवाशांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले.

लॉकडाऊन कालावधीत मुंबई विमानतळावरुन ३७०० प्रवाशांची जगभरात रवानगी, आयात निर्यातीचे प्रमाण वाढले
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने लॉकडाऊनमधील २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत जगभरातील विविध देशांतील भारतात अडकलेल्या ३७०० प्रवाशांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले. २० विशेष विमानांच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात आली. आयात व निर्यातीच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील हवाई वाहतुकीवर अनेक निर्बंध लादले. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. ही बंदी आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र विशेष विमानांच्या माध्यमातून भारतात अडकलेल्या सुमारे ३ हजार ७०० प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. मुंबई येथून लंडन, अॅटलांटा, फ्रॅंकफर्ट, सिंगापूर, पॅरिस, टोकियो यासह इतर विविध ठिकाणी या प्रवाशांना सुखरुपरित्या परत पाठवण्यात आले. हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध कंपन्या, विविध देशांची दूतावास कार्यालये, यांच्याशी समन्वय साधून ही कामगिरी करण्यात आली. या प्रवाशांना मायदेशी पाठवताना सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले. प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याबाबत पूर्ण काळजी घेण्यात आली. हवाई वाहतूकीवर निर्बंध आल्यानंतर विमानतळावर केवळ मालवाहतूक करणारी विमाने, विशेष विमाने, लष्कराची विमाने यांचीच वाहतूक केली जात आहे.
या कालावधीत मुंबई विमानतळाद्वारे सुमारे २४० मालवाहतूक करणाऱ्या विमानांचे व्यवस्थापन करण्यात आले. भारतातून हवाई मार्गे आयात व निर्यात होण्याचा देशातील विक्रम विमानतळावर झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोरोनाच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यास विमानतळ प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.