मुंबई ३० अंश सेल्सिअसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:57 IST2019-03-13T05:57:40+5:302019-03-13T05:57:57+5:30

अमरावती, चंद्रपूर, सोलापूर @ ३९; गोंदियात सर्वात कमी किमान तापमान

Mumbai is 30 degrees Celsius | मुंबई ३० अंश सेल्सिअसवर

मुंबई ३० अंश सेल्सिअसवर

मुंबई : राज्याच्या कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच असून, विदर्भासह मराठवाड्यातील अनेक शहरांच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारच्या कमाल तापमानाच्या नोंदीनुसार, अमरावती, चंद्रपूर आणि सोलापूर शहरांचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर मुंबईचे कमाल तापमान ३०.८ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यातील तापलेल्या शहरांच्या तुलनेत मुंबईचे कमाल तापमान नऊ अंशांनी खाली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

विदर्भात पावसाची शक्यता
१३ ते १४ मार्च दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १५ ते १६ मार्च दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २१ अंशांच्या आसपास राहील.

Web Title: Mumbai is 30 degrees Celsius