Mumbai Vikhroli Accident: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा करत असताना, मुंबईच्या विक्रोळी परिसरात एक अतिशय भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात उत्सवासाठी लावलेला एक अवजड साऊंड स्पीकर अंगावर पडल्याने तीन वर्षांच्या निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही सेकंदांच्या या दुर्घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली असून या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर नगरमध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रस्त्याच्या कडेला मोठमोठे साऊंड स्पीकर बसवण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी या चिंचोळ्या गल्लीतून नेहमीप्रमाणे लोकांची ये-जा सुरू होती.
त्याच वेळी डोक्यावर चिंध्यांचे मोठे गाठोडे घेतलेली एक व्यक्ती तिथून जात होती. या व्यक्तीच्या डोक्यावरील गाठोड्याचा धक्का वरून गेलेल्या स्पीकरच्या वायरला लागला. गाठोडे अडकल्याने वायरला जोराचा झटका बसला आणि रस्त्याच्या कडेला असलेला जड स्पीकर थेट खाली कोसळला. दुर्दैवाने, त्याच क्षणी ही ३ वर्षांची चिमुकली खेळत खेळत त्या व्यक्तीच्या मागावून धावत येत होती. तिला काही समजण्याच्या आतच तो अवजड स्पीकर तिच्या अंगावर आदळला.
हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
हा आघात इतका भीषण होता की, चिमुकली गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत तिला जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे आणि डोक्याला लागलेल्या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. काही क्षणांपूर्वी आनंदाने खेळणाऱ्या लेकीचा असा अंत झाल्याने पालकांवर आभाळ कोसळले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ
या घटनेचा ४० सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या गाठोड्यामुळे वायर खेचली गेल्याचे आणि त्यानंतर झालेल्या भीषण अपघाताचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. ही घटना अनवधानाने घडली असली तरी, सार्वजनिक ठिकाणी स्पीकर लावताना सुरक्षेची काळजी का घेतली गेली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघातीमृत्यूची नोंद केली असून, परिस्थितीचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. स्पीकर लावणाऱ्या आयोजकांकडून सुरक्षेचे नियम पाळले होते का आणि यामध्ये नेमकी कोणाची चूक आहे, याची चौकशी केली जात आहे.
Web Summary : A 3-year-old girl tragically died in Mumbai's Vikhroli area after a sound speaker fell on her during Republic Day celebrations. The incident, captured on CCTV, shows a wire being snagged, causing the speaker to fall. Police are investigating potential negligence in safety measures.
Web Summary : मुंबई के विक्रोली में गणतंत्र दिवस समारोह के दौरान एक साउंड स्पीकर गिरने से 3 साल की बच्ची की दुखद मौत हो गई। सीसीटीवी में कैद हुई घटना में एक तार में उलझने से स्पीकर गिर गया। पुलिस सुरक्षा उपायों में संभावित लापरवाही की जांच कर रही है।