Mumbai Fire: गोरेगावमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; ३ जण होरपळले, एकाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:09 IST2025-12-10T15:03:17+5:302025-12-10T15:09:01+5:30
Mumbai Gas Cylinder Explosion: मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून यात तीन जण होरपळल्याची माहिती आहे.

Mumbai Fire: गोरेगावमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; ३ जण होरपळले, एकाची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात आज (बुधवारी, १० डिसेंबर २०२५) सकाळी एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. या स्फोटात एक महिला आणि दोन पुरुष असे तीन जण होरपळले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गोरेगाव पश्चिम परिसरातील शहीद भगतसिंग नगर-२ येथील राजाराम चाळ येथे आज सकाळी सुमारे ७.४० वाजता हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आगही लागली. परंतु अग्निशमन दलाच्या पथकाचे आगमन होण्यापूर्वीच परिसरातील सतर्क रहिवाशांनी पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले.
महापालिका अधिकारी आणि एचबीटी ट्रॉमा केअर हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालतीदेवी (वय २८), सर्जन अली जावेद शेख (वय ३७) आणि गुल मोहम्मद अमीन शेख अशी जखमींची नावे आहेत. मालतीदेवी ३०-३५ टक्के भाजली आहे, तिची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. सर्जन अली जावेद शेखच्या दोन्ही पायाला दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर, गुल मोहम्मद अमीन शेखच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गणेश रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या स्फोटाच्या अधिक तपशिलांची चौकशी सुरू आहे.