Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 21:25 IST2026-03-26T21:24:35+5:302026-03-26T21:25:16+5:30
Mumbai Versova Crime News: मुंबईतील वर्सोवा परिसरात एका २० वर्षीय तरुणीचे केस कापून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईतील वर्सोवा परिसरात एका २० वर्षीय तरुणीचे केस कापून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणी एका बिल्डरची मुलगी असून, तिच्याच मैत्रिणीने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तीन तरुणींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी पीडिताचे आई-वडील एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत पीडितेची २१ वर्षीय कॉलेज मैत्रीण तिच्या इतर दोन मैत्रिणींसह तिथे पोहोचली. घराची बेल वाजवताच पीडितेने दार उघडले, त्यानंतर या तिघींनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. यावेळी आरोपी तरुणीने पीडितेचे केस कापायला सुरुवात केली, तर तिच्या इतर दोन मैत्रिणींनी या संपूर्ण कृत्याचे मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड केले. पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केला असता, आरोपींनी तिला हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तिची प्रतिमा खराब करण्याची धमकी दिली.
प्रियकराशी संबंध असल्याचा संशय
पोलिस तपासात या वादाचे मुख्य कारण प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे. पीडितेचा संपर्क एका मित्राच्या माध्यमातून आरोपी तरुणीच्या प्रियकराशी झाला होता. मात्र, आरोपीला त्यांच्या संबंधांवर संशय होता. आरोपीचा प्रियकर वारंवार पीडितेच्या केसांची प्रशंसा करायचा, ही गोष्ट आरोपीला खटकत होती. याच रागातून तिने पीडितेला धडा शिकवण्यासाठी हा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वी ७ मार्च रोजीही आरोपीने पीडितेचा मोबाईल तपासला होता. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नव्हते.
पोलीस तपास सुरू
पीडितेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी २० ते २१ वयोगटातील तीन आरोपी मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल.