मुंबई : बंद झालेल्या ७ विमा पॉलिसीतील अडकलेले पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय आजोबांची २ कोटी ३६ लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मध्य सायबर पोलिसांत शुक्रवारी सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
इन्कम टॅक्स रिटर्नसंदर्भात काम करणाऱ्या तक्रारदाराचा मुलगाही चार्टर्ड अकाउंटट आहे. गेल्यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉइसकॉल आला. स्वत:चे नाव दिनेश चतुर्वेदी असे सांगत आयआरडीएमध्ये आयजीएमएस सेक्शनमध्ये काम करत असल्याचे त्याने सांगितले.
व्हॉट्सॲपवर पाठवले खोटे ओळखपत्र
बंद झालेल्या सात विमा पॉलिसीचे प्रीमियम म्हणून जमा केलेले पैसे परत मिळवून देण्यासदंर्भात मदत करू शकतो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर त्याने खोटे आयकार्ड व्हॉट्सॲपवर पाठवले.
११ नोव्हेंबर रोजी पॉलिसीचा तपशील मेल करण्यास सांगून सुरुवातीला ४९, ६०६ रुपये पाठवण्यास तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर प्रोसेस पूर्ण झाल्याचे सांगून २४ लाख ८० हजार रुपये मिळणार असून त्यावरील टॅक्स भरण्यास सांगितला.
त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आणखीन ६ लाख रुपये भरले. पुढे अशाच प्रकारे कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५ नोव्हेंबर २०२४ ते १७ मे २०२५ दरम्यान वेगवेगळी कारणे पुढे करत आरोपीने तक्रारदाराला २ कोटी ३६ लाख ५७ हजार ९०३ रुपये भरण्यास भाग पाडले. ८१ व्यवहारात हे पैसे पाठवण्यात आले.
खात्यात पैसे जमा झालेच नाहीत
१९ मे रोजी त्यांनी खात्यात कधी पैसे जमा होतील याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपींनी काहीही प्रतिसाद दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.