मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील एका १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मयत मुलगी गेल्या सहा वर्षांपासून नैराश्यात होती, अशी माहिती समोर आली. पोलिसांना मुलीच्या बॅगेत एक सुसाइड नोट सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली.
या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासादरम्यान, पोलिसांना मुलीच्या बॅगेत सुसाईड नोट सापडली, "हा निर्णय माझा स्वतःचा आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये", असे लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मयत मुलगी एका आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थिनी असून ती गेल्या वर्षांपासून नैराश्यात होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. याआधीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे, मग आपण जगतोय? असे तिने एकदा मानसोपचारतज्ज्ञांना म्हटले होते, असे मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. याबाबत फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले.