Join us
Daily Top 2Weekly Top 5

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:27 IST

मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली.

मुंबई : श्री. काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मंत्री राज के. पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

मुंबादेवी प्राचीन मंदिर असून, याप्रती सर्वांनाच श्रद्धा, आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर आणि परिसरात मोठ्या संख्येने भक्त येत असतात. श्री. काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर तसेच तिरूपती देवस्थानाच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन दर्शन रांगा, वाहनतळ आणि इतर आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईमंदिर