जावयाने सासूसह स्वतःला टेम्पोत बंद करुन जाळले; मुलुंडमधल्या हादवरणाऱ्या घटनेचे कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:19 IST2025-02-26T13:19:06+5:302025-02-26T13:19:44+5:30
मुलुंडमध्ये सासू आणि जावयाचा जळालेल्या अवस्थेतीतल मृतदेह टेम्पोमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

जावयाने सासूसह स्वतःला टेम्पोत बंद करुन जाळले; मुलुंडमधल्या हादवरणाऱ्या घटनेचे कारण समोर
Mulund Crime: मुंबईच्या मुलुंड भागातून हादरवणारी बातमी समोर आल आहे. मुलुंडमध्ये जावयाने सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर आरोपीने स्वतःलाही पेटवून दिलं. १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी सासूला जबाबदार धरत जावयाने तिला जिवंत जाळून आपला राग व्यक्त केला. सुरुवातीला पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता. मात्र चौकशीनंतर जावयानेच सासूची हत्या करुन स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाचा राग मनात धरून जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना घडली. आरोपीने सासूला टेम्पोमध्ये कोंडले आणि तिच्यावर क्रूरपणे हल्ला करुन गाडी पेटवून दिली. या आगीत सासू आणि आरोपी जावई दोघांचाही मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी मृत जावयाविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाना सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या वाटत होती. मात्र नंतर सासूमुळे घटस्फोट झाल्याचा रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं.
आरोपीचे नाव कृष्णा दाजी अष्टनकर (५६) असून मृत सासूचे नाव बाबी दाजी उसरे (७२) होते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून भांडण होते. बाबी उसरे या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथे त्यांच्या घटस्फोटीत मुलगी आणि २२ वर्षांच्या नातवासह राहत होत्या. टेम्पो ड्रायव्हर असलेला कृष्णा गेल्या ७-८ वर्षांपासून त्याच्या पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होतं आणि त्याच्या टेम्पोमध्येच राहत होता.
बाबी उसरे यांनी पत्नीला मला सोडून द्यायला सांगितले असं कृष्णाला वाटतं होतं. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होता. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कृष्णा उसरेंच्या घरी गेला आणि बाबी उसरे यांना रुग्णालयात घेऊन जातो असं सांगितले. तो अनेकदा त्यांच्या घरी जात होता त्यामुळे बाबी उसरे विश्वास ठेवून त्याच्यासोबत टेम्पोत बसल्या. त्याने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला आणि त्याचे शटर ओढून घेत आतून कुलूप लावलं. यानंतर त्याने बाबी उसरे यांच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांना बेशुद्ध केलं.
त्यानंतर कृष्णाने बाबी उसरे यांना पेट्रोल आणि थिनर टाकून पेटवून दिलं. या आगीत कृष्णा देखील होरपळा. त्यामुळे दोघांचाही टेम्पोत जळून मृ्त्यू झाला. आजूबाजूच्या लोकांना टेम्पोतून आग येताना दिसताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनदलाने आग विझवल्यानंतर पोलिसांनी शटर उघडले असता आतमध्ये दोघांचेही जळालेले मृतदेह सापडले. टेम्पोमध्ये पोलिसांना हातोडा, थिनरची बाटली आणि लायटर सापडले.
दरम्यान, दोघांचेही मृतदेह वीर सावरकर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. नवघर पोलिसांनी कृष्णा दाजी अष्टनकर यांच्याविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू आहे.
सासूच्या घरी गेला आणि तिला दवाखान्यात नेतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून बाबी त्याच्या टेम्पोत बसले. परंतु, कृष्णाने तेथून पळ काढण्याऐवजी शटरला आतून कुलूप लावून त्यावर जड वस्तूने हल्ला केला, त्यावर पेट्रोल ओतून टेम्पोला आग लावली.