मुलुंडमध्ये झाडाची फांदी रिक्षावर कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 21:08 IST2018-07-24T15:15:39+5:302018-07-24T21:08:45+5:30
मुलुंडमध्ये रिक्षाला अपघात झाला आहे.

मुलुंडमध्ये झाडाची फांदी रिक्षावर कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी
मुंबई- मुलुंडमध्ये रिक्षाला अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. मुलुंड कॉलनीतील हिंदुस्थान चौकात एका झाडाची फांदी रिक्षावर कोसळली आहे. या अपघातात रिक्षामध्ये असलेल्या एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीररीत्या जखमी आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या झाडाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केली होती. परंतु तरी देखील या झाडांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. एका चालत्या रिक्षावर ही झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत रवी शहा यांचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी पूर्वी शहा आणि रिक्षाचालक चंद्रभान गुप्ता हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या सर्वांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु या रुग्णालयात कुठल्याच सोयीसुविधा नसल्यामुळे जखमींना इतर रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांना विनंती केली आहे की मृत व्यक्तींच्या परिवाराला अनुदान व जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार/खर्च लवकरात लवकर देण्यात यावे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक नील सौमय्या यांनी दिली आहे.