येत्या दीड वर्षात धावेल नवी मुंबईची मेट्रो - मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 12:54 AM2020-12-28T00:54:30+5:302020-12-28T00:55:01+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई शहराला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

Mukherjee to run Navi Mumbai Metro in next year and a half | येत्या दीड वर्षात धावेल नवी मुंबईची मेट्रो - मुखर्जी

येत्या दीड वर्षात धावेल नवी मुंबईची मेट्रो - मुखर्जी

Next

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाचे मेट्रो प्रकल्पाचे चारही टप्पे विविध कारणांमुळे रखडले आहेत. बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याची ९ वर्षांपासून रखडपट्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी सल्लागार म्हणून नागपूर महामेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे साधारण पुढील दीड वर्षात मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
     

लोकमत कॉफी टेबलमध्ये संजय मुखर्जी यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. कोविडमुळे सध्या सिडकोची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने आर्थिक नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. मात्र कोणत्याही विकास प्रकल्पांवर याचा परिणाम होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. मेट्रोचा पहिला टप्पा रखडल्याने खर्च वाढला आहे. त्याचा अप्रत्यक्ष फटका पुढील तीनही टप्प्यांना बसणार आहे. पहिल्या टप्प्यातील स्थानकांची कामे अपूर्ण असून त्यासाठी सिडकोकडे सध्या असलेले तंत्रज्ञान अपुरे पडत आहे. अभियांत्रिकी विभागाच्या कक्षा मर्यादित असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नागपूर महामेट्रोची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचे निश्चित झाले आहे. पुढील दीड वर्षात प्रलंबित कामे पूर्ण करून पहिला टप्पा सुरू करण्याची योजना असल्याचे संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई शहराला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे दळणवळण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. यात मेट्रोची महत्त्वाची भूमिका असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल कॉरिडोअर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा भार सिडकोवर येऊ नये, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रस्तावित कॉरिडोअरलगतचे भूखंड सिडकोच्या मालकीचे आहेत. बँका आणि वित्तसंस्थांकडे हे भूखंड तारण ठेवल्यास अल्प व्याजदरात कर्ज स्वरूपात प्रकल्पाचा निधी उभा करणे शक्य होणार आहे. हेच तंत्र इतर प्रकल्पांसाठीही लागू करण्याची योजना आहे.

मुंबई-ट्रान्स हार्बर लिंकचा मुंबईसह नवी मुंबईला मोठा फायदा होणार आहे. न्हावाशेवा-सीलिंकवरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास जलद व्हावा, यादृष्टीने सागरी मार्ग प्रस्तावित आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जेएनपीटी बंदराची उलाढाल वाढणार आहे. सध्या जेएनपीटी परिसरात कंटेनर यार्डची कमतरता आहे. सिडकोच्या जागेवरच अनेक ठिकाणी कंटेनर उभे असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून भव्य लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे संजय मुखर्जी यांनी सांगितले. 

Web Title: Mukherjee to run Navi Mumbai Metro in next year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.