अध्यक्ष महोदय, आयुष्य बरबाद होईल; शितल म्हात्रेंच्या व्हिडिओचा मुद्दा विधानसभेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:37 IST2023-03-13T13:28:22+5:302023-03-13T13:37:41+5:30
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला.

अध्यक्ष महोदय, आयुष्य बरबाद होईल; शितल म्हात्रेंच्या व्हिडिओचा मुद्दा विधानसभेत
मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत एकास अटकही केली आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण आज विधानसभेतही चर्चेत आलं. महिला आमदारांनी याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. आमदार मनिषा चौधरी आणि यामिनी जाधव यांनी पाँईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गात हा मुद्दा उपस्थित केला होता.
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला. व्हिडिओ मॉर्फींग करुन एका प्रतिष्ठीत महिलेचा, माजी नगरसेविकेचा हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. एका महिलेनं कितीवेळा मीडियासमोर येऊन स्वत:ला सिद्ध करायचं की मी चुकीची नाहीये, अध्यक्ष महोदय या मॉर्फींगमुळं तिचं आयुष्य बरबाद होईल, ती विवाहित महिला आहे. म्हणूनच, याप्रश्न कुठली कारवाई केली जाईल, असा सवाल यामिनी जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच, आमदार मनिषा चौधरी यांनीही शितल म्हात्रेंची बाजू घेत याप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी केली आहे.
जे पेरलं ते उगवलं - रुपाली ठोंबरे
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरल तेच उगवलं आहे. त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हांत्रेच्या कथित व्हायरल व्हिडिओ वर केलीय. तर आम्ही विरोधात असलो तरी त्यांच्या पाठीशी आहोत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे असही त्या म्हणाल्या आहेत.