"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
By ऋचा वझे | Updated: August 16, 2025 19:24 IST2025-08-16T19:21:26+5:302025-08-16T19:24:34+5:30
Malhar Fest 2025: राजकारणासंबंधी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचंही सुप्रिया सुळेंनी निराकरण केलं.

"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
Malhar Fest 2025: सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबईत आणखी एक उत्साह पूर्ण माहोल दिसून येत आहे हा माहोल म्हणजेच सेंट झेवियर्स कॉलेजचे (St Xaviers) मल्हार फेस्टिवल. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात दरवर्षी पार पडणारा मल्हार फेस्टिवल लक्ष वेधून घेतो. यंदाही या फेस्टिवलची धूम आहे. १५ आणि १६ ऑगस्ट असे दोन दिवस मल्हार फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. आज फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती रेवती डेरे, मुख्य न्यायाधीश देवेन्द्र कुमार उपाध्याय, लेखक अश्विन सांघी, खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली. खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी राजकारणातील धोरण आणि दृष्टिकोन यावर संवाद साधला.
मल्हार फेस्टिवल २०२५ चा आजचा दुसरा दिवस होता. दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील धोरण, उद्देश आणि दृष्टिकोन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या,"विरोधी पक्षात आहोत याचा अर्थ आम्ही धोरण ठरवू शकत नाही असा होत नाही. आम्हाला फार संघर्ष करावा लागतो असंही मी मानत नाही. ही लोकशाही आहे. सत्तेत असणाऱ्यांना आम्हीच सूचना देऊ शकतो."
त्या पुढे म्हणाल्या, "आता सरकारची लाडकी बहीण योजनाच घ्या. नुकतंच 25 लाख महिलांना या योजनेतून आता काढून टाकलंय. महिलांसाठी असलेल्या या योजनेतुन पुरुषही फायदा घेत होते. अशा policy आणून सरकारने भागधारकांची फसवणूकच केली आहे."
राजकारण एक करिअर
माझं तुम्हा तरुणाईला सांगणं आहे की राजकारणाकडेही एक करिअर म्हणून बघा. देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी तुम्हा तरुणांची गरज आहे. आज आपण बॉलिवूडसारख्या क्षेत्राकडे ग्लॅमरच्या नजरेतून बघतो. मात्र तिथेही किती कष्ट असतात हे आपल्याला कळत नाही. तसंच राजकारणाकडे एकाच दृष्टिकोनातून बघू नका. पॉलिसी आणि लीडरशिप वाटते तितकी सोपी आणि ग्लॅमरस नसते. त्यामागे खूप कष्ट असतात हे कायम लक्षात ठेवा.