"आपल्या प्रार्थनेमुळे, मी मरता मरता वाचले", खासदार नवनीत राणा आयसीयूतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 19:12 IST2020-08-15T15:33:59+5:302020-08-15T19:12:34+5:30
नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

"आपल्या प्रार्थनेमुळे, मी मरता मरता वाचले", खासदार नवनीत राणा आयसीयूतून बाहेर
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. "आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार" असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले आहे.