Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणा दाम्पत्य महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत; थोड्याच वेळात घोषणा? शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 14:33 IST

मातोश्रीवर येऊन दाखवाच, प्रसाद दिल्याशिवाय सोडणार नाही; शिवसैनिक आक्रमक; राणा दाम्पत्य मोठा निर्णय घेणार?

मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. त्यानंतर राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा विरुद्ध सेना संघर्ष पेटला असताना आता मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा कायम असताना राणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात दोघे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राणा दाम्पत्य माघार घेऊ शकतं. पंतप्रधान मोदी उद्या लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येत आहेत.

मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागा; शिवसैनिकांचा पवित्रा कायमराणा दाम्पत्य माघार घेण्याची शक्यता असताना शिवसैनिक मागे हटण्याच्या तयारीत नाही. राणा यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी. त्या अमरावतीला परत जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मातोश्रीच्या बाहेरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. 

मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिराकडे बोट दाखवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना प्रसाद देणारच, असं मातोश्रीबाहेरील महिला शिवसैनिक म्हणाल्या. राणा दाम्पत्याला कोणी सुपारी दिली आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. सुपारी देता येते, तशीच ती परतही घेता येते. उद्या मोदी मुंबईत येणार आहेत. म्हणून कदाचित सुपारी परत घेतली असावी, अशा शब्दांत महिला शिवसैनिकांनी राणांचा समाचार घेतला.

टॅग्स :उद्धव ठाकरेरवी राणानवनीत कौर राणा