विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:04 IST2024-12-12T17:01:50+5:302024-12-12T17:04:51+5:30
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळून लावण्याची मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण
MP Narayan Rane : भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोध करणारा हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. नारायण राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.
अधिवक्ते सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जात विनायक राऊत यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. विनायक राऊत यांच्या याचिकेत तथ्ये आणि तपशील नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती. त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर विनायक राऊत यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत नारायण राणे यांनी फसवणुकीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला होता.
विनायक राऊत यांच्यामार्फत दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत दोष असल्याचा आरोप करत पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींच्या नावांच्या संदर्भात कोणत्याही तपशीलांचा उल्लेख नसल्याचे म्हटलं आहे. निवडणूक याचिकेत आरोपांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असते. या कृत्यामध्ये असलेल्या पक्षाचे नाव आणि अशी घटना केव्हा घडले याची तारीख आणि ठिकाण यासह संपूर्ण माहिती द्यावी लागते, असे नारायण राणे यांच्या याचिकेत म्हटलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निकाल रद्दबातल ठरवून नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी याचिका विनायक राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या याचिकेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी पुन्हा निवडणुका घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली. या याचिकेत आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन झालं असून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही म्हटलं होतं.
तसेच नारायण राणेंचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन धमकावले. जर तुम्ही नारायण राणे यांना मतदान केलं नाही, त्यांना लीड दिलं नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचं नाही, असं नितेश राणे यांनी मतदारांना धमकावलं, असा उल्लेखही विनायक राऊत यांनी याचिकेत केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना समन्स बजावलं होतं.