मुंबईची मेट्रो, लोकल रेल्वे एक होणार? एकत्रीकरणासाठी हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 07:30 IST2025-07-14T07:30:28+5:302025-07-14T07:30:48+5:30
केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळाला सूचना; समिती करणार शिफारसी

मुंबईची मेट्रो, लोकल रेल्वे एक होणार? एकत्रीकरणासाठी हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील शहरी एकात्मिक वाहतूक, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा योग्य वापर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंडळाच्या कार्यक्षमता आणि संशोधन विभागाचे कार्यकारी संचालक संजीव कुमार यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रो यांचे एकत्रीकरण करणे, शक्य तेथे पादचारी पूल किंवा रेल्वे स्थानके उभारणे आणि मेट्रो यांना जोडणी देणे अशा सूचनांचा यात समावेश आहे.
महामुंबईतील लोकलची स्वस्त प्रवासी वाहतूक आणि भविष्यात ३५० किलोमीटरपर्यंत उभारले जाणारे मेट्रोचे जाळे यांचा प्रवाशांना एकत्रित लाभ घेता यावा, यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्राच्या सूचनेनूसार संबंधित प्राधिकरणांनी आपापले प्रतिनिधी द्यावेत, असे पत्र यापूर्वीच देण्यात आले आहेत. लवकरच त्यांची एकत्रित बैठक होणार आहे.
समितीचे अध्यक्ष, सदस्य कोण?
मुंबई मेट्रो उभारणीचे बहुतांश कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केले जात आहे. यामुळे या समितीचे अध्यक्षपद एमएमआरडीएकडे सोपवण्यात आले आहे. त्यात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मेट्रो, सिडको, बेस्ट, महारेल यांसह नगर विकास विभाग यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे.
या समितीमार्फत रेल्वे आणि मेट्रो स्थानक जोडण्यासाठी पादचारी पूल उभारणी, भूयारी मार्ग किंवा अन्य पर्यायांबाबत शिफारस करण्यात येईल. यात प्रमुख प्राधिकरणांचे प्रतिनिधी असल्याने शिफारशींची अंमलबजावणीही वेगाने आणि विनाअडथळा होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.