तोट्यातील राज्य लॉटरी चालू ठेवण्याच्या हालचाली सुरू; अधिकारी करणार केरळ मॉडेलचा अभ्यास
By यदू जोशी | Updated: January 28, 2025 06:21 IST2025-01-28T06:20:38+5:302025-01-28T06:21:02+5:30
केरळसारख्या राज्यांमध्ये तेथील राज्य लॉटरी कशी चांगल्या पद्धतीने चालविली जाते, याचा अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या काही अधिकाऱ्यांना पाठविले जाण्याची शक्यता आहे.

तोट्यातील राज्य लॉटरी चालू ठेवण्याच्या हालचाली सुरू; अधिकारी करणार केरळ मॉडेलचा अभ्यास
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर हजारो लॉटरी विक्रेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला. आता ही लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावावर वित्त विभाग फेरविचार करणार आहे. लॉटरी सुरू करण्यासाठी काय करता येईल, यावर विभाग विचार करत आहे असे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले.
विक्रेत्यांना अजित पवारांचे आश्वासन
लाॅटरी विक्रेत्यांच्या संघटनेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांना भेटले आणि लॉटरी बंद करू नका, अशी मागणी केली. पवार यांनी आम्हाला पुढील आठवड्यात चर्चेला बोलावतो, असे आश्वासन दिले आहे, असे लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातर्डेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केरळसारख्या राज्यांमध्ये तेथील राज्य लॉटरी कशी चांगल्या पद्धतीने चालविली जाते, याचा अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या काही अधिकाऱ्यांना पाठविले जाण्याची शक्यता आहे.
गोयल यांची मागणी कारणीभूत
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी जून २०१९ मध्ये राज्यसभेत बोलताना लॉटरीवर देशभरात बंदी आणण्याची मागणी केली होती. प्रत्येक राज्य सरकारांना त्यांनी तसे निवेदनदेखील पाठविले होते. ३ जुलै २०२४ रोजी त्यांनी हे निवेदन दिले. त्यावर वित्त विभागाने ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक घेतली.