शिवतीर्थावर माेठी लगबग, एबी फॉर्म देण्यास सुरुवात, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:44 IST2025-12-28T12:43:42+5:302025-12-28T12:44:20+5:30
राजू पाटील व नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष गजाननन काळे यांनी राज यांच्याशी चर्चा केली. ठाण्यातील उमेदवारांचे एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांकडे देण्यात आले.

शिवतीर्थावर माेठी लगबग, एबी फॉर्म देण्यास सुरुवात, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. उद्धवसेनेचे आ. मिलिंद नार्वेकर यांनी राज यांची भेट घेऊन जागावाटपाला पूर्णविराम दिला. तर, कल्याण-डोंबिवलीसंदर्भात मनसेचे माजी आ. राजू पाटील व नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष गजाननन काळे यांनी राज यांच्याशी चर्चा केली. ठाण्यातील उमेदवारांचे एबी फॉर्म जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांकडे देण्यात आले.
निश्चित झालेल्या प्रभागातील उमेदवारांची प्राथमिक यादी नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांनी राज यांच्याकडे सादर केली आहे. त्यावर राज अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत. यादरम्यान आ. नार्वेकर यांनी राज यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेत अर्ज भरता यावा, यासाठी शनिवारपासून एबी फॉर्म देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. ठाण्यातील उमेदवारांना रविवारी रात्री एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
मनसे नेते मातोश्रीवर
शनिवारी सकाळपासून मनसे नेत्यांचे शिवतीर्थावर बैठकीचे सत्र सुरू होते. काही जागा बदलण्याचा विचार पुढे आल्याने राज यांच्याशी चर्चा करून
नेते नांदगावकर, सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
काही जागा बदलण्याबाबत मातोश्रीवर चर्चा झाली. आज रात्री त्यावर पुन्हा बैठक होऊन आम्ही अंतिम टप्प्यावर येऊ. त्यानंतर जागांबाबतची घोषणा करू. बोलणी करताना काही जागा द्याव्या, तर काही जागा घ्याव्या लागतात. जागांबाबत आमच्या अनुभवाप्रमाणे वाटाघाटी करत आहोत. जेवढ्या जागा पदरात पाडून घेता येतील तितक्या आम्ही घेत आहोत.
बाळा नांदगावकर, नेते, मनसे