नवजात बाळाच्या आईला हत्येच्या प्रकरणात जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 06:30 IST2025-05-29T06:30:53+5:302025-05-29T06:30:53+5:30

महिलेला अटींवर तिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला

Mother of newborn baby granted bail in murder case | नवजात बाळाच्या आईला हत्येच्या प्रकरणात जामीन

नवजात बाळाच्या आईला हत्येच्या प्रकरणात जामीन

मुंबई : दुचाकीसमोर आलेल्या व्यक्तीसोबतच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी एका महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अनम अन्सारी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गुन्ह्याच्या वेळी गरोदर होती व आता तिला महिन्याचे बाळ आहे, त्यातही या घटनेनंतर ती फरार झाली नाही, अशा विविध मुद्यांवर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी तिला जामीन मंजूर केला आहे.

१६ मार्च रोजी अन्सारी पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करताना  ओमप्रकाश शर्मा हे त्यांच्या दुचाकीसमोर आल्यावर शर्मा व अन्सारी दाम्पत्यामध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.  अनमने शर्मा यांना हाताने व चप्पलेने मारल्याचा आरोप आहे, तर तिच्या पतीने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याने शर्मा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनमच्या पतीला अटक केली. त्यावेळी अनम ३० आठवड्यांची गरोदर होती. तिने ५ एप्रिलला दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. महिला आता २५ दिवसांच्या बाळाची आई आहे. या प्रकरणात तिला अटक करून चौकशी करण्याची गरज नाही, मारहाणीत वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यासाठी तिला अटक करण्याची गरज नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. प्रत्येक आठवड्यात सोमवारी महिलेने वाकोला पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे आणि तपासात सहकार्य करावे, पुराव्यांसोबत छेडछाड करू नये, साक्षीदारांना धमकावू नये. तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, अशा अटींवर तिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 

Web Title: Mother of newborn baby granted bail in murder case