वरळीत पीएसआयच्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; आईन धावत जाऊन नराधमाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:47 IST2026-01-23T13:47:27+5:302026-01-23T13:47:51+5:30
वरळीत एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

वरळीत पीएसआयच्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; आईन धावत जाऊन नराधमाला पकडले
Mumbai Crime: मुंबईच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वरळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका ५५ वर्षीय व्यक्तीने केला. मात्र, मुलाच्या आईने दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे या चिमुरड्याची सुखरूप सुटका झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ठोंबरे हे मुंबई पोलीस दलात पीएसआय म्हणून कार्यरत असून त्यांचे कुटुंब वरळी परिसरात राहते. बुधवारी संध्याकाळी ठोंबरे यांची पत्नी घरात स्वयंपाक करत असताना, त्यांचा ५ वर्षांचा मुलगा शेजारील एका मुलीसोबत जवळच असलेल्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेला होता. काही वेळातच सोबत गेलेली मुलगी धावत घरी आली आणि तिने घाबरलेल्या अवस्थेत सांगितले की, "एक माणूस दादाला जबरदस्ती ओढून घेऊन जात आहे." हे ऐकताच आईने घराबाहेर धाव घेतली.
समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने नेत होता आरोपी
मुलाच्या आईने बाहेर येऊन पाहिले असता, एक अनोळखी व्यक्ती मुलाचा हात धरून त्याला खेचत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने घेऊन जात होती. आईने जराही वेळ न घालवता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तातडीने मदतीला धावले. नागरिकांनी आरोपीला घेराव घालून पकडले आणि मुलाला त्याच्या तावडीतून सोडवले.
आरोपीला बेड्या, पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची ओळख लक्ष्मण चौधरी (वय ५५, रा. साकीनाका) अशी पटली आहे. वरळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी लक्ष्मण चौधरी हा साकीनाका येथून वरळीला का आला होता? त्याने मुद्दाम पोलीस अधिकाऱ्याच्या मुलालाच लक्ष्य केले होते का? की तो एखाद्या मोठ्या टोळीचा भाग आहे? अशा अनेक प्रश्नांचा शोध आता वरळी पोलीस घेत आहेत.
मुंबईत भीतीचे वातावरण
पोलीस वसाहतींच्या आसपास किंवा गजबजलेल्या भागात जर पोलिसांच्याच मुलांचे अपहरण होत असेल, तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. वरळी सी-फेस आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत.