Join us

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सरकारी संस्थांकडून अधिक गहू खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 02:23 IST

साधारणत: गहू कापणी मार्च महिन्याच्या शेवटी सुरू होते; तर खरेदी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव असूनदेखील मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरकारी संस्थांकडून अधिक गहू खरेदी झाली आहे. मागील वर्षी सरकारी संस्थांकडून ३४१.३१ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली होती. परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन घोषित केलेला असूनदेखील ३४१.५६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २५ हजार टन जास्त गहू खरेदी झाली.

साधारणत: गहू कापणी मार्च महिन्याच्या शेवटी सुरू होते; तर खरेदी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. या वर्षी गव्हाचे पीक कापणीसाठी तयार होते; परंतु २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाउन घोषित झाला. यामुळे कापणीदेखील लांबणीवर गेली. परिणामी, १५ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये गहू खरेदी सुरू झाली.

कोरोनाचा संसर्ग देशभर पसरलेला असल्याने गहू खरेदी सुरक्षित पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान सरकारसमोर होते. यासाठी देशभरात खरेदी केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या प्रत्येक सुविधेचा वापर करून नवीन केंद्रांची स्थापना करण्यात आली. पंजाब, हरयाणा आणि मध्य प्रदेश या प्रमुख खरेदीदार राज्यांमध्ये केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. केंद्रांवर शेतकऱ्यांना आपले पीक आणण्यासाठी ठरावीक तारीख व स्लॉट उपलब्ध केले. यामुळे जास्त जमाव टाळण्यास मदत झाली. यात सामाजिक अंतर व स्वच्छताविषयक नियमांचे पालन केले गेले.

गहू भरण्यासाठी लागणाºया जूट पिशव्यांचे उत्पादन थांबल्याने संकट निर्माण झाले होते; परंतु त्याला पर्याय म्हणून चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यात आल्या. सर्व प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने गहू भिजला. यामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे राहिले. भारत सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाने यात हस्तक्षेप करून तोडगा काढला. तसेच या पूर्ण प्रक्रियेत काम करणाºया कामगारांना सुरक्षा उपकरणे तसेच त्यांच्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था करून खबरदारीच्या उपाययोजनादेखील केल्या.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार