काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 06:48 IST2025-10-30T06:48:19+5:302025-10-30T06:48:19+5:30
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात

काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केल्यानंतर दोन दिवसांत ४५०हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी बुधवारी दिली. पुढील दोन दिवसांत ही संख्या आणखी वाढू शकते. इच्छुकांकडून प्रति अर्ज ५०० रुपये शुल्क घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६पर्यंत घ्याव्यात, असे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग तसेच सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. साधारण जानेवारीच्या मध्यापर्यंत मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईत ठाकरे बंधू प्रथमच ही निवडणूक एकत्र लढवतील, असे संकेत मनसे आणि उद्धवसेनेकडून स्पष्टपणे दिले जात आहेत, तर काँग्रेस नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी नेतृत्त्वाकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी पक्षात इच्छुकांची कमी नाही, हेच निवडणूक अर्ज वितरणावरून स्पष्ट होते.
काही महिन्यांपासून पालिकेशी निगडीत काही प्रकरणांवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. घरांच्या प्रश्नाबाबत म्हाडा कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. मेट्रो स्टेशनला नावे देताना देवी, देवता, महापुरुषांचा अपमान झाल्याच्या मुद्यावर मंगळवारी आंदोलनही करण्यात आले.