१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 08:29 IST2025-08-19T08:28:12+5:302025-08-19T08:29:25+5:30

Mumbai University Exam Reschedule: घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना सर्वाधिक फटका; पाणी साचल्यामुळे लोकल गाड्यांवर वेगमर्यादा

Mumbai University Exam Reschedule More than 100 local trains cancelled mega plight of workers returning home are the worst hit | १००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!

१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!

महेश काेले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल प्रवाशांचे बेहाल झाले. सकाळच्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. दुसरीकडे, हार्बर मार्गावर लोकल ४० ते ४५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळच्या गर्दीच्या वेळेत सुमारे ४८ लोकल तर दिवसभरात सुमारे १२० पेक्षा जास्त लोकल रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरच्या चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर, टिळक नगर रेल्वे स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. अधिकाऱ्याने सांगितले की, पाणी साचल्यामुळे लोकल गाड्यांवर वेग मर्यादा घालण्यात आली होती. सकाळी मेल एक्स्प्रेस थांबवण्यात आली आणि लोकल गाड्या चालवण्यास प्राधान्य देण्यात आले, तर दुपारच्या सत्रात मेल एक्स्प्रेस पाठवण्यास प्राधान्य देण्यात आले आणि त्यामुळे लोकलमध्ये गर्दी दिसून आली. तर संध्याकाळी घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला लोकल सेवा विलंबाने सुरू असल्याचा सर्वाधिक फटका बसला.

दुपारी कामावर जाणाऱ्यांना फटका

सोमवारी दुपारच्या सत्रात लोकल उशिराने धावत होत्या. गणेश उतेकर यांनी १२:४० ची धीमी लोकल डोंबिवली स्टेशनवरून १ वाजता पकडली. ती लोकल ४ वाजता सीएसएमटी स्टेशनवर पोहचली. या लोकलने रोज ते २:२० पर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकलच्या विलंबाने सोमवारी त्यांना  लेटमार्क लागल्याचे ते म्हणाले.

अप मार्गावर खोळंबा

दुपारच्या सत्रात दादर ते मस्जिद दरम्यान अनेक धीम्या अप लोकल सुमारे २५ मिनिटे एकामागे एक थांबत होत्या. यावेळी या भागातील सर्व स्टेशनवर अनेक लोकल रद्द झाल्याच्या घोषणा होत होत्या. परंतु नेमके कारण सांगण्यात येत नव्हते. 

माटुंगा स्टेशनवर पाणी

पश्चिम रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रुळांवर सोमवारी पावसाचे पाणी तुंबले. रेल्वेने नालेसफाई आणि पाणी उपसा पंप लावूनदेखील पाण्याचा निचरा झाला नाही. 
सोमवारी पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील अनेक स्थानकांदरम्यान पाणी तुंबले होते. इतर स्थानकांवरील पाण्याचा निचरा वेळेत होत होता. असे असताना दादर आणि माटुंगा रोड स्टेशनवरच्या पाण्याचा निचरा धीम्या गतीने सुरू होता. याचा फटका रेल्वे सेवांना बसला. रेल्वेने एस. व्ही. रोडवरील पावसाचे पाणी रेल्वे भागात येत असल्याने  रुळांवरील पाण्याचा उपसा करण्यासाठी तीन पंप बसवले. हे पाणी रेल्वे धारावी नाल्यात सोडण्यात आले. परंतु, धारावी नाला अगोदरच तुंबला असल्याने हे पाणी पुन्हा रुळांवर आले.

मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यापीठाने या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा २३ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी जारी केले आहे.

Web Title: Mumbai University Exam Reschedule More than 100 local trains cancelled mega plight of workers returning home are the worst hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.