Join us

"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:53 IST

मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

Eknath Shinde: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदतीचे पॅकेज मोठे पॅकेज जाहीर करून धीर देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित शेतकऱ्यांसाठी  ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केले. यावेळी राज्यात अतिवृष्टीमुळे ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी  शासन पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचे म्हटलं. तसेच विरोधकांनी केलेल्या मागणीवरूनही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत मदतीची घोषणा केली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारने पंजाबपेक्षा जास्त मदत दिल्याचे म्हटलं.

"शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचे पाऊल उचलू नये. कारण शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. काही लोक म्हणत होते की तामिळनाडू, पंजाब या राज्यांप्रमाणे शेतकऱ्याला मदत द्या. तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटक पेक्षाही आपले मदतीचे पॅकेज मोठे आहे. तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय, शेतकऱ्याचं काय काय नुकसान झाले याचा वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन मदत झालेली आहे आणि मदत होईल. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या असे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्तीचे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मिळणार आहेत. परंतु मनरेगांमधून तीन लाख रुपये हेक्टरी एका जमिनीचं रेशो आहे. जमीन पूर्ववत करणे सोपं नाही. हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता आणि तो आपल्या सरकारने मिटवला आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुद्धा सहकार्य होणार आहे. दोन एकरची मर्यादा काढून तीन एकरची मर्यादा आपण केलेली आहे. ती देखील रक्कम मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत. म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांवर फोकस केलेला आहे. कितीही ओढाताण झाली तरी आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. एनडीआरएफचे निकष आहेत त्यामध्ये देखील दहा हजार रुपये आपण ऍड केलेले आहेत," असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra offers farmers more aid than Punjab, says Eknath Shinde.

Web Summary : Maharashtra's government announced a ₹31,628 crore package for farmers affected by heavy rains, exceeding aid given by states like Punjab. Eknath Shinde assured support, urging farmers to avoid drastic measures, emphasizing the government's commitment to their recovery and well-being.
टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र