Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५ हून अधिक महिलांना घातला गंडा, लुटले ५० लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:49 IST

shaadi.com आणि  jeevansathi.com या साईट्सवरून फसवणूक करणाऱ्या बेड्या 

मुंबई -  shaadi.com आणि  jeevansathi.com या विवाह जुळविणाऱ्या संकेस्थळावर आपले खोटे प्रोफाईल बनवून मुंबई, पुणे आणि नवी मुंबईतील तब्बल २५ हून महिलांना फसविणाऱ्या ठगास गुन्हे शाखा कक्ष - ११ ने अटक केली आहे. चारकोप पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका ३७ वर्षीय अविवाहित महिलेने गुन्हा दाखल केला होता. कल्याण येथे राहणाऱ्या कृष्णा चंद्रसेन देवकाते (वय - ३१) असे या ठग तरुणाचे नाव असून त्याने २५ तरुणींना ५० लाखांना गंडा घातला आहे.  

jeevansathi.com या संकेतस्थळावर चारकोप येथे राहणाऱ्या एका तरूणीला कृष्णाच्या प्रोफाईलकडून रिक्वेस्ट आली होती. आपल्या मनाप्रमाणे प्रोफाईल असल्याने तिने रिक्वेस्ट स्वीकारली. shaadi.com आणि  jeevansathi.comवर कृष्णा याने आपले प्रोफाईल तयार केले होते. यात त्याने TRAI या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी करीत असल्याचे लिहीले होते. मनाप्रमाणे स्थळ मिळाल्याने या तरूणीने कृष्णा याला रिक्वेस्ट स्वीकारली होती. नंतर मोबाईल नंबरची देवाण घेवाण झाली. एकमेकांशी बोलणे वाढले. कृष्णा याचे बोलणे वागणे या तरूणीला आवडायला लागले. लग्न करण्याचे ठरल्यानंतर दोघांची जवळीकही वाढली. कृष्णा याने तरूणीचा विश्वास संपादन केले आणि खर्चासाठी तिच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करू लागला. काही दिवस हे सुरू होते. मात्र, नंतर तो या तरूणीला टाळायला लागला. याबाबत तिने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष - ११ च्या पथकाने तपास सुरू केला.

दोन्ही संकेतस्थळे आणि इतर तांत्रिक बाबी तपासल्यानंतर कृष्णा हा कल्याण येथे राहत असल्याची माहीती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक अरविंद घाग, सहायक निरिक्षक शरद झिने, नितीन उत्तेकर यांच्यासह पथकाने ठाण्यातून कृष्णा याला शोधून काढले. चौकशीमध्ये कृष्णा याने २५ तरूणींना अशा प्रकारे फसविल्याचे समोर आले. कृष्णा याच्या विरोधात चारकोप, वांद्रे-कुर्ला काॅम्पलेक्स, नवी मुंबईतील कोपर खैरणे, पुणे येथील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे आहेत. कृष्णा हा नालासोपारा पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्यात तुरूंगात शिक्षाही भोगून बाहेर आला आहे. सध्या जामिनावर तो बाहेर आहे. त्याच्यावर यापेक्षा अधिक गुन्हे असण्याची शक्यता आहे. बदनामीच्या भितीने तरूणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईगुन्हाधोकेबाजीपोलिस