Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:18 IST

मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा ५ जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार, काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही सहभाग

मुंबई : मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार आहे. या दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या तारखा बदलण्यात आल्या असून, आता हा मोर्चा ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट हेही मोर्चात सहभागी होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  माेर्चासाठी ५ जुलैची तर, उद्धव ठाकरे यांनी ७ जुलैची घाेषणा केली हाेती. मात्र, उद्धव यांनी मनसेच्या मोर्चासोबत आपला मोर्चा काढण्यास मान्यता दिल्याची माहिती उद्धवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दिली. आमची बैठक संपल्यानंतर राज यांचा फोन आला. मराठी माणसांसाठीचे दोन मोर्चे एकत्र निघणे बरे दिसत नाही. एकत्र आंदोलन झाल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल, अशी भूमिका राज यांनी मांडल्याचे राऊत यांनी सांगितले. 

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनीही मराठी माणसाचे ऐक्य दिसणे महत्त्वाचे आहे. पण, ६ जुलैला आषाढी एकादशी असल्याने मोर्चाची तारीख ५ किंवा ७ असावी असे सांगितले. त्यांचा निरोप राज यांना सांगितला असता त्यांनी ५ जुलै निश्चित केली, असे राऊत म्हणाले.

हिंदी सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित निघणारा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल. -संदीप देशपांडे, मनसे प्रवक्ते 

तिसऱ्या भाषेचा विचार करीत असताना मुलांवर ताण पडू नये, याचा विचार केला गेला आहे. तोंडओळख एवढाच अभ्यासक्रम आहे. तो लिखाण, वाचनापर्यंत नाही. -आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री 

महाराष्ट्रहिताचा प्रश्न असतो तेव्हा महाराष्ट्रासाठी व जेव्हा राष्ट्रहिताच्या प्रश्नावर राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून आमचा पक्ष उभा राहतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे हा आग्रह आहे. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट 

या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर सर्व पक्ष, संस्था, साहित्यिक आणि मराठीप्रेमींचा एकच मोर्चा निघावा अशी काँग्रेसची भूमिका होती. -हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनामनसेराजकारणहिंदी