मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना मिळाला रोजगार, नवाब मलिक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:48 IST2021-06-09T09:48:07+5:302021-06-09T09:48:54+5:30
Nawab Malik : गेल्यावर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ५५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना मिळाला रोजगार, नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत विविध उपक्रमांद्वारे राज्यात मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी दिली.
गेल्यावर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर या वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ५५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https:// rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात.
कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेही वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ९३८ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाइन मेळावे आदी उपक्रमांमधून करतात. त्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मे महिन्यात विभागाकडे २१ हजार ७१० इतक्या इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात ५ हजार ४३०, नाशिक विभागात ४ हजार ९५७, पुणे विभागात ५ हजार ५०८, औरंगाबाद विभागात ३ हजार १४८, अमरावती विभागात १ हजार २५६, तर नागपूर विभागात १ हजार ४११ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी १० हजार ८८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ६१६, नाशिक विभागात २ हजार ७९४, पुणे विभागात ३ हजार ४४९, औरंगाबाद विभागात ८८१, अमरावती विभागात १०६, तर नागपूर विभागात ४० इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले, अशी माहिती मलिक यांनी दिली.