मान्सूनने ओलांडला तीन हजार मिलीमीटरचा मोठा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:40 IST2019-09-06T06:40:40+5:302019-09-06T06:40:49+5:30
बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुर्ला, भारतनगर खाडीत मोहम्मद शहारूख शेख (२४) पडला

मान्सूनने ओलांडला तीन हजार मिलीमीटरचा मोठा टप्पा
मुंबई : जून महिन्यापासून ५ सप्टेंबरच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल ३ हजार ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कुलाबा वेधशाळेत २ हजार १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळा संपण्यास महिना शिल्लक असतानाच पावसाने मोठा पल्ला गाठला आहे. तत्पूर्वी २०१० आणि २०११ सालच्या मान्सून हंगामात पावसाने ३ हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दशकभराने पाऊस पुन्हा एकदा ३ हजार मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुर्ला, भारतनगर खाडीत मोहम्मद शहारूख शेख (२४) पडला. त्याला बाहेर काढून सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी खेरवाडी जंक्शन येथे मिठी नदीत चार मुलांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या. त्यापैकी तिघांना सुखरूप बाहेर काढले. एकाचा शोध लागलेला नाही. तर, बुधवारी रात्री हिंदमाता येथे पाण्यात तंरगणारा अशोक मयेकर (६०) यांचा मृतदेह आढळला.
शोधकार्य थांबले...
वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरातील मिठी नदीत बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक मुलगा बुडाल्याची घटना घडली. या मुलाचा शोध अग्निशमन दल आणि नौदलाच्या पथकामार्फत सुरू होता. गुरुवारी दुपारी ४ वाजता अग्निशमन दल आणि नौदलामार्फत सुरू असलेले शोधकार्य थांबविण्यात आले.
४० ठिकाणी शॉर्टसर्किट
बुधवार सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १० ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. ४० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले तर १० ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या.
वार्षिक सरासरी (मिमी) कुलाबा २२०३ सांताक्रुझ २५१४
टक्केवारी कुलाबा ९८.१५ सांताक्रुझ १२२.४
आज कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार
६ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
७ सप्टेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
८ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
९ सप्टेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
मुंबईतही काही ठिकाणी पडणार जोरदार
६ आणि ७ सप्टेंबर : शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरींसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.