मुंबई/पुणे : ज्या सूखसरींची राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तो मान्सून यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मे महिन्यातच राज्यात मान्सून येण्याची ही १६ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये मान्सून रविवारी चक्क तळकोकणात पोहोचला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोवा राज्यातही त्याने धडक दिली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा आणि देवगडपर्यंत भाग व्यापला. देवगड, बेळगावी, हावेरी, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमामार्गे मान्सून जात आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबई, ठाण्यात बरसल्या जाेरदार सरी
मुंबई : मुंबईसह महामुंबई परिसरात रविवारी पहाटे जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर, दिवसभर रिमझिम सुरू होती. ठाणे शहर आणि परिसरात हलक्या सरींनी हजेरी लावली. महामुंबईत दुपारपर्यंत ढगाळ वातावरण हाेते.
मुंबईकर आज रविवारच्या सुट्टीच्या मूडमध्ये होते. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे बेत आखले होते. मात्र शहर आणि उपगनराला साखरे झोपेतच पावसाने झोडपून काढले. शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसल्याने पाणी साचून डबकी तयार झाली.
ठाणे शहर परिसरात सकाळी हलक्या सरींनी हजेरी लावली. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण हाेते. जिल्ह्यात २४ तासांत १८ मिमी पावसाची नाेंद झाली. पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही पाऊस झाला. गेल्या २४ तासांत मुरुडमध्ये ३५ मिमी पावसाची नोंद झाली.
जूनच्या प्रारंभी स्पष्ट होईल मान्सूनचे चित्र
तब्बल १२ दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र, सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस पडत आहे. हा पाऊस २७ तारखेपर्यंत पडेल. त्यानंतर पाऊस थांबेल. महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला नाही. ताे वेळेआधीच दाखल होण्याची घाेषणा करण्याची घाई ‘आयएमडी’ने केली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसात पावसात खंड पडेल. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल होण्यास थोडा अवधी लागेल, असे दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असेल. यंदा पावसाळ्याच्या ४ महिन्यांत प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय तापमान न्यूट्रल पन्नास टक्क्यांहून अधिक राहणार असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता कमी असेल.
हवामान विभाग म्हणताे, यंदा जोरदार बॅटिंग करणार
यंदा मान्सूनने मे महिन्यातच महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. त्यामुळे यंदा पाऊस जोरदार बॅटिंग करेल, असे संकेत असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राजधानी दिल्लीत दाणादाण; विमानसेवाही विस्कळीत
राजधानी दिल्लीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्याने अनेक तास विमान वाहतूक विस्कळीत झाली. सखल भागात पाणी साचल्याने व विजेचे खांब व झाडे मुळासह उन्मळून पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
वादळ व तुफान पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत झाली. १७ आंतरराष्ट्रीय विमानांसह ४९ विमानांच्या मार्गात बदल करावा लागला. १८० विमानांना उशीर झाला, तर काही उड्डाणे रद्द झाली.