Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना दिलासा : मोनो सुरू, मेट्रो आजपासून धावणार; पण ‘नो मास्क, नो एन्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 02:29 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मोनोरेल चालविली जाते. शनिवारी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मोनोरेलची पाहणी करून तिकीट यंत्रणेची माहिती घेतली. (Metro)

मुंबई : लॉकडाऊननंतर तब्बल सात महिन्यांनी रविवारपासून मुंबईची मोनोरेल नियमाचे पालन करीत प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. तर सोमवारपासून मेट्रोदेखील धावणार आहे. त्यामुळे लोकलवरील भार कमी होऊन दैनंदिन वाहतुकीची गाडी हळूहळू पूर्वपदावर येईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मोनोरेल चालविली जाते. शनिवारी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मोनोरेलची पाहणी करून तिकीट यंत्रणेची माहिती घेतली. त्यानंतर रविवारी मोनोरेल सेवेत दाखल झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हा नियम मोनोरेलच्या प्रवाशांनादेखील लागू आहे. सकाळी ७.०३ ते सकाळी ११.४० आणि दुपारी ४.०३ ते रात्री ९.२४ या वेळेत मोनोची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.मेट्रोच्या रोज २०० फेऱ्या -वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मेट्रो सोमवारपासून सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत धावेल. रोज २०० फेऱ्या होतील. गर्दीच्या वेळी दर साडेसहा मिनिटांनी, तर गर्दी नसलेल्या वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो सेवा असेल. प्रत्येक फेरीत ३०० प्रवासी प्रवास करू शकतील. येथेही मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे प्रवाशांसाठी बंधनकारक असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :मेट्रोरेल्वेमुंबईकोरोना वायरस बातम्या