Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो दोन अ मार्गिकेवरील स्टेशनच्या कामांना मुहूर्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 16:48 IST

दहिसर डी एन नगर मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यावर

१७ स्टेशनच्या दर्शनी भागांची कामे होणार सुरू 

मुंबई : गेली तीन वर्षे  बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांचे अजस्त्र पिलर्स आणि त्यांना जोडणारे गर्डर बघणा-या मुंबईकरांना आता दहिसर ते डी. एन. नर या मार्गावरील (दोन अ) स्थानकांचा चेहरामोहरासुध्दा दिसू लागणार आहे. या मार्गिकेवरील ९ स्टेशनच्या दर्शनी भागांच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होत असून उर्वरित ८ स्टेशनच्या कामांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. कंत्राटदाराच्या हाती वर्क आँर्डर पडल्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही कामे त्यांना पूर्ण करायची आहेत.

१८. ६ किमी लांबीच्या या मार्गिकेवर १७ स्टेशन असून त्यांची कामे करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल काँर्पोरेशनच्या माध्यमातून चार स्वतंत्र पँकेजमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन पँकेजमधिल तांत्रिक आणि आँर्थिक देकारांची प्रक्रिया अंतिम करून हे काम गोदरेज आणि बाँयसी या कंपन्यांना मिळाली आहेत. त्यासाठी निविदेत नमूद केलेला अंदाजित खर्च ७५ कोटी ५१ लाख रुपये होता. प्रत्यक्षात हे काम ४.८३ लाख रुपये जास्त दराने म्हणजेत ७९ कोटी ३१ लाख रुपयांना देण्यात आले आहे. दहिसर, आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी काँलनी आणि एकसार ही पहिल्या टप्प्यातील आणि डाँन बाँक्सो, शिंपोली, महावीर नगर आणि कामराज नगर ही दुस-या टप्प्यातील स्थानके आहेत. 

८ स्टेशनसाठी वाटाघाटी सुरू

उर्वरित दोन पँकेजमधिल ८ स्टेशनच्या कामांसाठी ३२ कोटी ८० लाख आणि ३६ कोटी ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, दोन ठिकाणच्या लघुत्तम कंत्राटदारांचे दर अनुक्रमे ३६ कोटी ३३ लाख आणि ४२ कोटी ४९ लाख असे आहेत. अंदाजपत्रकातील दरांपेक्षा या निविदा ९.९१ आणि ९.३६ टक्के जादा दराने आल्या आहेत. त्यामुळे लघुत्तम निविदाकार असलेल्या कंपन्यांशी वाटाघाटी करून या निविदांना अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. त्यात गोरेगाव, आदर्शनगर, शास्त्रीनगर, डी. एन. नगर, चारकोप, मालाड, कस्तूरी पार्क आणि बांगरू नगर या स्थानकांचा समावेश आहे.

मेट्रो सातच्या स्टेशनची कामेही लवकरत

दहिसर आणि अंधेरी मार्गावरील मेट्रो ७ मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यावरील १२ स्टेशनच्या दर्शनी भागांचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. त्या कामांच्या निविदा प्रक्रियासुध्दा अंतिम टप्प्यात आहेत. २ अ आणि सात या मार्गिका नोव्हेंबर, २०२० मध्ये सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनासह अनेक कारणांमुळे ते लांबणीवर पडले असून नोव्हेंबर, २०२१ पर्यंत या मार्गांवर मेट्रो धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :एमएमआरडीएमेट्रोदहिसरमुंबई