Join us

Mohit Kamboj: बहुतेक, मला अटक करायची तयारी सुरूय; भाजप नेत्याच्या ट्विटनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 20:03 IST

Mohit Kamboj: मलिक यांच्या अटकेनतर मोहित कंबोज यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमले होते.

मुंबई - महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीनं अटक केली असून 7 मार्चपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. जवळपास ८ तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. नवाब मलिकांना अटक केल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kambhoj) यांनी जल्लोष करत म्यानातून तलवार काढली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून आता अटक करण्याची तयारी सुरू असल्याचं स्वत: त्यांनीच सांगितले.

मलिक यांच्या अटकेनतर मोहित कंबोज यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी, कंबोज यांनी म्यानातून तलवार बाहेर काढत मलिक यांच्या अटकेचा जल्लोष केला. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून कंबोज यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून आता स्वत: मोहित कंबोज यांनी ट्विट करुन, बहुतेक मला अटक करण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच, अद्याप गुन्हा निश्चित नाही, पण गुन्हेगार निश्चित करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या ट्विटवेळी मोहित कंबोज यांनी जय भवानी... जय शिवाजी... असे कॅप्शनही दिले आहे.  

मलिक विरुद्ध कंबोज वाद

भाजपा नेते मोहित कंबोज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद नवीन नाही. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ ड्रग्स पार्टीवर धाड टाकल्यानंतर मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा उघडला होता. मलिकांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मोहित कंबोज यांचं नाव घेऊन त्यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांच्या बेनामी संपत्ती आणि ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते. नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्या शेरोशायरीच्या माध्यमातून ट्विटरवर वाद रंगत होते. संजय राऊत आणि नवाब मलिक म्हणजे राजकारणातील सलीम-जावेद जोडी असल्याचा टोला मोहित कंबोज यांनी लगावला होता.  कंबोज यांना संरक्षण द्या - फडणवीस

मागील अनेक दिवसांपासून भाजपा नेते गोपीचंद पडळकर, मोहित कंबोज यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी येथे हल्ला झाल्याचीही घटना घडली. त्यानंतर आता नवाब मलिकांना टार्गेट केल्यामुळे भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केले आहे.

टॅग्स :भाजपाअटकपोलिसमुंबई