Join us

संत महंमद खान महाराजांची पालखी चंद्रभागेतिरी, जाणून घ्या दिंडीचं वेगळेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:38 IST

महंमद खान यांना विठ्ठलभक्‍तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत.

मुंबई - विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गणुरी गावचे गजानन महाराज भक्‍त संत महंमद खान यांची पालखी गेल्या 13 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहे. गणुरी गावातून मजल-दरमजल करत ही वारी तब्बल 30 दिवसांनी पंढरीत पोहोचली. 8 जून रोजी जवळपास 300 वारकऱ्यांना घेऊन निघालेली दिंडी 8 जुलै रोजी चंद्रभागेतिरी दाखल झाली. श्री संत महंमद खान महाराज असे या पालखीचे नाव असल्याने अनेकांना प्रश्न पडतात. मात्र, महंमद खान महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या आज्ञेनुसार अनिल महाराज देशमुख हे गेल्या 13 वर्षांपासून अखंड पायी वारी करत आहेत.  

महंमद खान यांना विठ्ठलभक्‍तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. त्यामुळे त्यांच्या पश्‍चातही ही प्रथा अशीच कायम राहावी यासाठी संत महम्मद खान मठ संस्थान गणुरीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असते. महंमद खान महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या वारीची प्रथा बंद पडली होती. मात्र, पेशाने एसटी महामंडळात चालक असलेल्या अनिल देशमुख यांनी 13 वर्षांपूर्वी ही वारी पुन्हा सुरू केली. 

मला श्री संत महंमद खान महाराजांचा दृष्टांत झाला होता. त्यावेळी, माझी वारी बंद झाली असून तू पंढरीची वारी सुरू करावी, असे महाराजांनी मला म्हटले. महाराजांच्या आज्ञेनुसार मी गावातील महाराज भक्त आणि विठ्ठल भक्तांना घेऊन वारी सुरू केल्याचे अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सुरुवातील 3 ते 4 वारकरी या वारीत असून आता ही संख्या 300 पर्यंत पोहोचली आहे. आमच्या पालखीतील दिंडीत एक मुस्लीम वारकरीही असून शहीर पठाण असे त्यांचे नाव आहे.  

एसटी महामंडळ प्रशासनाकडून गेल्या 13 वर्षांपासून दरवर्षी मला 40 दिवसांची सुट्टी देण्यात येते. 3 वर्षांपूर्वी मला काही कारणास्तव सुट्टी नाकारण्यात आली होती. त्यावेळी, पंढरपूरचे नेते सुधाकरराव परिचारक हे महामंडळाचे अध्यक्ष होते. मी माझी कैफीयत त्यांना सांगितली. त्यावेळी, मला कायमस्वरुपी वारीसाठी 40 दिवसांची सुट्टी देण्याच यावी, असा आदेशच परिचारक यांनी काढला. त्यामुळे वारीकाळात मला 40 दिवसांची सुट्टी मिळते, असे अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

महमंद खान महाराजांबद्दलची दंतकथा

श्री संत महंमदखान महाराज हे श्री तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या कालखंडात श्रीक्षेत्र गणोरी येथे फकीर वेशात प्रकट झाले. ते दिवसभर मशिदत राहून रात्री विठ्ठल मंदिरात राहायचे. रात्री मंदिराचे पुजारी शेज आरती केल्यानंतर घरी जायचे. त्यानंतर कुलूप न उघडता महंमदखान महाराज मंदिरात प्रवेश करायचे. श्री विठ्ठल रूख्मिणीची पहाटेच पुजा करून दार न उघडता पुन्हा बाहेर यायचे. सकाळी ज्यावेळेस पुजारी मंदिरात जायचे त्यावेळेस त्यांना देवाची पुजा संपन्न झालेली दिसत. तेथील पुजाऱ्याने सलग तीन दिवस घडलेला हा प्रकार पाहून मंदिराच्या अध्यक्षांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, अध्यक्षांनी रात्रीसाठी पहारेकरी ठेवले. तेव्हाही मंदिराच्या आत असलेल्या विहीरीवर पहाटे कोणी आंघोळ करत असल्याचा आवाज आला व त्यानंतर मंदिरात पुजा होत असल्याचे दिसत होते. पण, पुजा करणारा दिसत नव्हता हि गोष्ट पुन्हा अध्यक्षांच्या कानावर घालण्यात आली. त्यावेळी, मध्यरात्री महाराजांनी मंदिराच्या अध्यक्षांना दृष्टांत दिला. तसेच मी विठ्ठलभक्त व वारकरी असल्याचे सांगितले. त्यानंतर, महाराजांच्या पुजेत अडथळा आणू नका ही बातमी अध्यक्षांनी गावकऱ्यांना दिली. 

महाराज मंदिरात पूजा करताना त्यांचे नाव विचारले असता 'मुझे महंमदखान कहते है' असे त्यांनी म्हटले. त्यानंतर गावात हिंदू व मुस्लिमांमध्ये वाद झाला. मात्र, महाराजांनी काही दिवसातच तो वाद मिटवला. त्यामुळे त्यांना धर्मसमन्वय महर्षी ही पदवी देण्यात आली. श्री महाराज घोड्यावर बसून पंढरपूरची वारी करायचे, महाराजांच्या लिला व अनुभूती पाहून सर्वच धर्मातील लोक महाराजांचे भक्त झाले. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर वारी बंद पडली. पण, 13 वर्षांपूर्वी सुरुवातीला चार ते पाच भक्तांनी पुढाकार घेऊन ही वारी सुरू केली. आजही वारीत अनेक मुस्लीम भक्त पूजा करतात, काही वारीतही येतात. आजही वारी अध्यक्ष अरविंद देशमुख व दिंडी प्रमुख हभप अनिल महाराज देशमुख गणोरीकर यांच्या मार्गदर्शनात ही पाऊले पंढरीचा वाट मोठ्या उत्साहात चालतात.  

टॅग्स :पंढरपूरपंढरपूर वारीसोलापूरअमरावती