भुयारी मेट्रोतून मोबाइल नेटवर्क लवकरच होणार पूर्णपणे गायब; ‘एमएमआरसीएल’ने दूरसंचार पायाभूत सुविधेचा करार केला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:02 IST2026-03-21T13:02:26+5:302026-03-21T13:02:36+5:30
‘एमएमआरसी’ने सौदी अरेबियास्थित एसीईएस इंडिया कंपनीला सर्व भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये दूरसंचार प्रणाली बसविण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, कंत्राटदाराने करारातील अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने घेतला आहे.

भुयारी मेट्रोतून मोबाइल नेटवर्क लवकरच होणार पूर्णपणे गायब; ‘एमएमआरसीएल’ने दूरसंचार पायाभूत सुविधेचा करार केला रद्द
मुंबई : आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर दूरसंचार पायाभूत सुविधा करार रद्द करण्याचा निर्णय मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवरील काही स्थानकांत मिळणारे मोबाइल नेटवर्क आता पूर्णपणे गायब होणार आहे. त्यातून प्रवाशांना मोबाइल नेटवर्कविनाच प्रवास करावा लागणार आहे.
‘एमएमआरसी’ने सौदी अरेबियास्थित एसीईएस इंडिया कंपनीला सर्व भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये दूरसंचार प्रणाली बसविण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, कंत्राटदाराने करारातील अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने घेतला आहे.
भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून मोबाइल नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. मेट्रो ३ मार्गिकेवर सध्या काही मोबाइल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क मिळत होते. तर काही कंपन्यांचे नेटवर्क काहीच स्थानकात मिळत होते. मात्र, आता ‘एमएमआरसी’ने करार रद्द केल्याने संपूर्ण नेटवर्क जाण्याची चिन्हे आहेत.
आपत्कालीन संपर्क सुविधा नेहमीप्रमाणे कार्यरत
सध्या मेट्रो ३ वरील स्थानके आणि बोगद्यांमध्ये प्रवाशांना मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटीची अडचण येत आहे. प्रवाशांना खात्री देतो की आपत्कालीन संपर्क सुविधा यांसह सर्व महत्त्वाच्या सुरक्षा प्रणाली नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत, असे ‘एमएमआरसी’ने स्पष्ट केले. तसेच नेटवर्क सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मागील कंत्राटदाराने करारातील अटी पूर्ण केल्या नसल्यामुळे त्यांची सेवा समाप्त केली आहे. नवीन सेवा प्रदाता नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, असे ‘एमएमआरसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.