गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 07:41 IST2025-01-28T07:41:27+5:302025-01-28T07:41:46+5:30
राज्यात एकूण २५९ फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील २१ व्हॅन सुसज्ज आहेत.

गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू केली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काढले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून लोकार्पण केले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहेत. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक साहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.
अशी आहे ही व्हॅन...
या व्हॅनमध्ये वैज्ञानिक तज्ज्ञ व सहायक कर्मचारी असतील. रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार.
स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स आहेत.
सीसीटीव्हीने सज्ज अशा या व्हॅन कनेक्टेड आहेत. त्यामुळे गुन्हेकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार
पुरावे नष्ट करणे, पुरव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही.