Mobile connections more than the total population in Maharashtra | महाराष्ट्रातील जनता मोबाइलच्या मुठीत, एकूण लोकसंख्येपेक्षा मोबाइल जोडण्या जास्त

महाराष्ट्रातील जनता मोबाइलच्या मुठीत, एकूण लोकसंख्येपेक्षा मोबाइल जोडण्या जास्त

- संदीप शिंदे
मुंबई : मोबाइलने ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच स्वत:च्या मुठीत घेतले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या घडीला सुमारे साडेबारा कोटींच्या आसपास असताना इथल्या वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या १३ कोटी १० लाखांवर झेपावल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.
सप्टेंबर, २०१८ पासून व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या संयुक्त पद्धतीने व्यवसाय करत आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दरकपात करणाऱ्या या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही आजच्या घडीला राज्यातील सर्वाधिकमोबाइल ग्राहक (५ कोटी ३९ हजार) त्यांच्याकडे आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यांच्या ग्राहकसंख्येत तब्बल ३ कोटी १९ लाखांनी घट झाली आहे. एअरटेल आणि टाटा २१ जुलै, २०१९पासून एकत्रित सेवा पुरवत असून, त्यांच्याकडे २ कोटी ५६ लाख ग्राहक आहेत. त्यांच्या ग्राहकसंख्येतही २१ हजारांनी घट झाली आहे.
कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत ग्राहकांची कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना, सरकारी मालकीच्या एमटीएनएल, बीएसएनएल या कंपन्यांची धाव लाखांच्या पुढे सरकताना दिसत नाही. गेल्या तीन वर्षांत एमटीएनएलच्या ग्राहकांची संख्या १२ लाख ७७ हजारांवरून ११ लाख ९४ हजारांपर्यंत कमी झाली, तर बीएसएनएलने ७१ हजार ग्राहक जेमतेम टिकविले आहेत. राज्यातील बहुसंख्य लोकांकडे एकापेक्षा जास्त मोबाइल क्रमांक आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या लक्षणीय दिसत असल्याचे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही क्रमांक बंद असू शकतील, असा त्यांचा दावा आहे.

जिओची भरारी

राज्यातील प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीची ग्राहक संख्या घटत असली, तरी जिओ कंपनीचे ग्राहक तीन वर्षांत दुपटीने वाढले. २०१७ साली कंपनीचे २ कोटी २० लाख ग्राहक होते. ती संख्या आता ४ कोटी ३२ लाखांवर झेपावली आहे.

फक्त ४४ लाख लॅण्डलाइन

राज्यातील लॅण्डलाइन जोडण्यांचे प्रमाण वर्षागणिक घटत आहे. २०१७ साली राज्यात ४७ लाख २१ हजार लॅण्डलाइन होते. ते आता ४४ लाख ८९ हजारांवर आले आहे. सर्वाधिक ग्राहक एमटीएनएल (१७ लाख) आणि बीएसएनएलकडे (९ लाख) आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mobile connections more than the total population in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.