"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
By प्रविण मरगळे | Updated: January 8, 2026 16:48 IST2026-01-08T16:46:57+5:302026-01-08T16:48:03+5:30
ठाकरे बंधू यांच्या युतीत हा वार्ड मनसेला सोडण्यात आला होता. परंतु याठिकाणी मनसेने विद्या भरत आर्या कांगणे यांना उमेदवारी दिली.

"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेमधील गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. नुकतेच मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यापाठोपाठ मनसेचे सरचिटणीस राजा चौगुले, प्रवक्ते हेमंत कांबळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता जोगेश्वरी येथे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मनसेचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक असलेले संदीप ढवळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख संदीप ढवळे आणि वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर तसेच उद्योजक ईश्वर रणशूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. संदीप ढवळे हे कट्टर राज ठाकरे समर्थक मानले जायचे. विशेष म्हणजे जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा कार्यकर्त्यांची फळी उभा केली होती. ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात पहिल्यांदा एकत्र आले तेव्हा जय जवान गोविंदा पथकाने सात थरांची सलामी दिली होती. संदीप ढवळे हे मनसे नेते अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे संदीप ढवळे यांनी मनसे सोडल्याने पक्षाला जोगेश्वरीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जोगेश्वरीतील वार्ड क्रमांक ७४ मधून संदीप ढवळे यांच्या पत्नी सायली ढवळे निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. ठाकरे बंधू यांच्या युतीत हा वार्ड मनसेला सोडण्यात आला होता. परंतु याठिकाणी मनसेने विद्या भरत आर्या कांगणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप ढवळे यांनी पत्नी सायली ढवळे यांचा अपक्ष अर्ज भरला होता. २ जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संदीप ढवळे आणि सायली ढवळे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी संदीप ढवळे यांची समजूत काढली. त्यानंतर संदीप ढवळे यांनी पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता.
विशेष म्हणजे २ जानेवारीला संदीप ढवळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात आज मी आणि माझी पत्नी सायली संदीप ढवळे यांनी राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. साहेबांचा आदेश हाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम आहे. त्यामुळे सायली ढवळे उमेदवारी अर्ज मागे घेत आहे असं सांगितले होते. मात्र ६ दिवसांनी संदीप ढवळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेत मनसेला धक्का दिला आहे.