Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षावर अनधिकृत फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:39 IST

मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देमालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्लाफेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केलाखासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

मुंबई - मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला आहे. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान माहिती मिळताच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुशांत माळवदे यांची भेट घेण्यासाठी मालाडला रवाना झाले आहेत. 

हल्ला होण्याच्या काही वेळापुर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये पार पडली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. याचे गंभीर परिणाम मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला आहे. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं आहे. मनसेने गुंडागर्दी सुरु केली आहे, त्यांनी कायदा हातात घेतल्यानेच असे प्रकार होत असल्याचं संजय निरुपम बोलले आहेत. 

मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम बोलले होते की, 'फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल'. 

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं. जिथे जिथे अन्याय, गैरप्रकार दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.

दरम्यान राज ठाकरे यांनी आज कल्याण, डोंबिवली शहरातील  विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची महापालिकेत जाऊन भेट घेतली. शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले.  फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहीजे. केवळ खालील अधिकाऱ्यांवर ती जबाबदारी सोपवून फेरीवाले हटणार नाहीत, असं सांगत ही शहरं आपल्याला साफ हवीत की नको? शहर स्वच्छ कधी करणार?, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई का होत नाही, असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना विचारला. फेरीवाल्यांना जास्तीत जास्त दंड आकाराल्यास त्यांचे वारंवार बसणे कमी होईल. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेनं महापालिकेच्या हद्दीत कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. सोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणीही राज यांनी केली. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेसंजय निरुपम