मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:17 IST2025-07-03T05:16:09+5:302025-07-03T05:17:44+5:30
या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या सभास्थळाची पाहणी करत नियोजनाबाबत चर्चा केली. या वेळी गर्दी वाढली तर रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
मुंबई : राज्य शासनाने हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे-उद्धवसेनेने ५ जुलै रोजी वरळीच्या डोम येथे विजयी मेळावा घेण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या सभास्थळाची पाहणी करत नियोजनाबाबत चर्चा केली. या वेळी गर्दी वाढली तर रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार आणि उद्धवसेनेकडून अनिल परब, आशिष चेंबूरकर यांच्यासह अन्य नेत्यांनी डोम आणि परिसराची पाहणी केली. अंदाजे किती लोक, किती वाहने, कार्यकर्ते येतील, याचा अंदाज घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा पक्षीय मेळावा नाही, असे जाहीर करण्यात आले असले तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.
कार्यक्रमाची पूर्वतयारी, नियोजन सुरू आहे. शनिवारी हा डोम पूर्ण भरेलच, पण गर्दीने रस्तेही जाम होतील, असा अंदाज आहे, असे परब यांनी सांगितले. ठाकरे बंधू आयोजक असले तरी हा कार्यक्रम मराठी माणसाचा आहे. यात कोणताही राजकीय विषय नाही. ठाकरे आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्रात कधी तुटलेले नाही, असेही ते म्हणाले.
सर्वच नेत्यांना निमंत्रण
मनसेचे नांदगावकर यांनी याबाबत सांगितले की, मेळाव्याचे सगळ्यांना खुले निमंत्रण ठाकरे बंधूंनी दिले आहे. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. ही जागा कमी पडणार आहे, याची कल्पना आहे, पण नाईलाज आहे. पाऊस आहे.
शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. दुर्दैवाने त्याचा निकाल लागला नाही. पण, हा मेळावा उत्तम प्रकारे पार पडेल. राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण दिले जाईल. भाषण कोण कोण करणार, यावर मात्र निर्णय घेऊ, असे नांदगावकर यांनी सांगितले.