Join us  

तुमची अक्कल पाजळू नका; मनसेचा भाजपा नेते राम कदम, प्रविण दरेकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 12:11 PM

तसेच बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येत आहे

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या महाधिवेशनात घेतलेला हिंदुत्वाचा पवित्रा पाहून मनसे-भाजपा यांच्यात आगामी काळात युती होईल अशी चर्चा सुरु आहे. मात्र यामध्ये मनसे सोडून भाजपात गेलेले राम कदम आणि प्रविण दरेकर यांच्या वक्तव्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी टोला लगावला आहे. 

मनसेने आपली विचारधारा सोडली कर भाजपासोबत घेण्याचा विचार करु असं विधान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यावरुन अमेय खोपकर म्हणाले की, विचारधारा वगैरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मनसे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करणार आहे. याबाबत विविध ठिकाणी मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यावरुन भाजपा आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात नेहमीच  बांग्लादेशी लोकांना हाकलून द्या असं म्हणत होते. सध्या शिवसेना सत्तेत असल्याने याचा विरोध ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता मनसेच्या रुपाने पुढे येत आहे असं विधान केलं होतं.

यावरुन अमेय खोपकर म्हणाले की, कदाचित राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील पण जेव्हा हे मनसेमध्ये होते, तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका.कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली,त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये. पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हांला काडीचीही गरज नाही अशा शब्दात अमेय खोपकर यांनी राम कदम आणि प्रविण दरेकर यांना इशारा दिला आहे.  

टॅग्स :मनसेशिवसेनाप्रवीण दरेकरराम कदमभाजपा