Join us  

“कौतुक कार्यसम्राटांचं होतं, फेसबुकवरील टोमणेसम्राटांचं नाही”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 5:12 PM

बघू मुख्यमंत्री काय बोलतात. फेसबुक लाइव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत, या शब्दांत मनसेने निशाणा साधला आहे.

मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली असून, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. यातच आता योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या मशिदींवरील बेकायदा लाउडस्पीकर उतरवण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईबाबत राज ठाकरे यांनी योगी सरकारचे अभिनंदनही केले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यसम्राटांचे कौतुक केले जाते. फेसबुकवरून टोमणे मारणाऱ्या टोमणेसम्राटांचे नाही, असा खोचक टोला मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. 

राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे आभार मानणारे ट्विट केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. धार्मिक तेढ कुणाकडून निर्माण होते? राज ठाकरे म्हणतात की, जो न्यायालयाचा आदेश आहे, त्याचे पालन सरकारने करायला हवे. न्यायालयाच्या आदेशाचे पालने करायला पाहिजे म्हणणारे लोक धार्मिक तेढ कसे निर्माण करतात, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. जे लोक म्हणत आहेत की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार नाही, डेसिबलचे पालन करणार नाही, त्या लोकांना सांगायला हवे की धार्मिक तेढ निर्माण करू नका. आम्ही नियमांचे पालन करत आहोत. जे पालन करणार नाही, त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस देण्याची गरज आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. 

कौतुक कार्यसम्राटांचे होते

संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी जाहीर सभेवरूनही निशाणा साधला. बघू मुख्यमंत्री काय बोलतायत ते. त्यांचे फेसबुक लाइव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. आता मुख्यमंत्री करोना सोडून काहीतरी बोलतायत याचा आनंद आहे. योगी आदित्यनाथ यांनी काम केले, भोंग्याचा विषय मार्गी लावला. कौतुक कार्यसम्राटांचे होते, फेसबुकवर टोमणे मारणाऱ्या टोमणेसम्राटांचे होत नाही, असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. यावर बोलताना, मनसेच्या स्थापनेला १६ वर्ष झाली. यात राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या आहेत. कोणत्याही सरकारने आम्हाला सरळ मार्गाने सभा घेऊ दिली नाही. त्यामुळे सभेची परवानगी कशी घ्यायची, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही अनुभवातून शिकलो आहोत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेउद्धव ठाकरेसंदीप देशपांडेराजकारण