Join us  

Sandeep Deshpande : “…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; आदित्य ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 10:33 AM

MNS Sandeep Deshpande And Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या निवदेनानंतर मनसेने बीडीडी चाळ पुनर्विकासावरून खोचक टोला लगावला आहे.

वरळीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक निवदेन जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी नवीन नियोजनानुसार नागरीकांना केवळ तीन वर्षामध्ये डोळ्यादेखत नवीन घर मिळणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी रहिवाशांनाच संक्रमण शिबीर अथवा बाहेर 25000 रुपये मासिक भाडे घेऊन राहावे लागणार आहे. या काळात 25000 रुपये मासिक घरभाडे देण्याची जबाबदारी म्हाडाची असेल. तर बाकीच्या रहिवाशांना बाहेर राहण्याची गरज नसून थेट नवीन घरामध्ये जाता येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरेंच्या निवदेनानंतर मनसेने बीडीडी चाळ पुनर्विकासावरून खोचक टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला” असं म्हणत देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी निवेदनात “वरळी बी. डी. डी. पुनर्विकास आराखडा रहिवाशांना याविषयीची कोणतीही माहिती हवी असल्यास ती म्हाडा कार्यालयात उपलब्ध आहे” असं म्हटलं आहे. 

“रहिवाशांना आवश्यक वाटल्यास सामूहिक सादरीकरण म्हाडाच्या वतीने करण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही शंका असल्यास त्यासाठी म्हाडा स्वतः सामूहिक बैठकांचे आयोजन करून आपल्या शंकेचे निरसन करेल आणि यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वरळी बीबीडी प्रकल्प बनवणारे टाटा प्रोजेक्ट्स ही कंपनी केवळ विकासक अथवा कंत्राटदार म्हणून नाही तर ती एक सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.”

“गेली 25 वर्षे आपण या पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहात, परंतु यामध्ये स्वतःची घरं भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत. खंत हीच वाटते की, हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल” असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेआदित्य ठाकरे