Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे बोलले, पण राज ठाकरेंची वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका काय? समर्थन की विरोध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:04 IST

MNS Stand On Waqf Board Amendment Bill: मनसे नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

MNS Stand On Waqf Board Amendment Bill: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. आता राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर चर्चा होत असून, तेथेही हे विधेयक पारित करण्यावर केंद्रातील एनडीए सरकारचा भर असणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेचे यावर काय म्हणणे, यासंदर्भात नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.

वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील भ्रष्टाचाराला विरोध; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध नसून, त्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसे सहन करतील, असे सांगत उद्धव ठाकरेंनी टीका केली. विविध मुद्द्यांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

"जेव्हा भाजप सरकार जाईल, तेव्हा...!" वक्फ विधेयकावरून ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान 

आम्ही त्याचवेळी सांगितले होते की...

या विधेयकातील काही मुद्दे हे योग्य असल्याचा सूर उद्धव ठाकरेंचा होता. तर संजय राऊत यांनी यावरून मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगवेगळी आहे का, सकाळी संजय राऊतांना ऐकले, तर ते सकारात्मक असे काही बोलताना दिसले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका अधिकृत म्हणायची की, संजय राऊतांनी मांडलेली भूमिका अधिकृत म्हणायची, त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नेमकी कोणती? असा सवाल करत, आम्ही त्याचवेळी सांगितले होते की, वक्फचे विधेयक आणणे गरजेचे होते. त्यात सुधारणा करणे गरजेचे होते. कारण अनेक तक्रारी आणि अनेक विचित्र गोष्टी त्यात होत होत्या. त्यामुळे जे झाले, ते चांगले झाले, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

दरम्यान, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील एनडीए आणि इंडिया आघाडीचे नेते वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केवळ भारतात नाही, तर परदेशातील अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता राज्यसभेत काय होते, याकडे भारतातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :वक्फ बोर्डसंदीप देशपांडेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामनसेराज ठाकरे