मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:00 IST2026-01-02T15:58:27+5:302026-01-02T16:00:23+5:30
माजी नगरसेविका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षा अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात
मुंबईमध्ये उद्धवसेना आणि मनसेची युती झाली आहे. अनेक ठिकाणी उद्धवसेनेला, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) जागा सुटल्या आहे. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. भांडुपमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या नॉट रिचेबल झाल्या. उद्धवसेनेच्या खासदाराच्या मुलीविरोधातच त्या मैदानात उतरलेल्या आहेत.
माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्रमांक १४४ मधून अर्ज दाखल केला आहे. इथे उद्धवसेनेकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. उद्धवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत.
बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिशा माजगावकर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नॉट रिचेबल झाल्या. आज फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने विरोधकाकडून दगा फटका होवू नये म्हणून त्या नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे.
अनिशा माजगाावकर ह्या २०१२ साली प्रभाग क्रमांक ११४ मधून मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. तर २०१७ साली शिवसेनेच्या रमेश कोरगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणूक लढवण्यास त्या इच्छूक होत्या.
उद्धवसेनेचे रमेश कोरगावकर हे येथून पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक होते. दरम्यान, हा प्रभाग जागावाटपामध्ये उद्धवसेनेला सुटल्यानंतर उद्धवसेनेकडून येथे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली.