राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:01 IST2025-01-28T14:54:37+5:302025-01-28T15:01:49+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.

MNS Raj Thackeray starts preparations for Mumbai Municipal Corporation elections | राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका

राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका

MNS Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा तयारीला लागली आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरुन नव्या दमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. मनसेने मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला असून राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून  महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार पडलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकांची वाट पाहत आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ३० जानेवारी रोजी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. वरळीच्या डोम सभागृहात गुरुवारी सकाळच्या सुमारास हा मेळावा पार पडणार आहे. त्यामध्ये मनसेची महापालिका निवडणुकांसाठी पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत  राज ठाकरे यांच्याकडून लवकरच मनसे पक्षसंघटनेत बदल केले जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली होती. विधानसभेनंतर आगामी महापालिका निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत बैठकीत चर्चा झाली. मनसे पक्षसंघटनेचा कायापालट होण्यासाठी त्यादृष्टीने बदल करायला हवेत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचेही संदीप देशपांडे म्हणाले. बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत सामील होऊनच निवडणूक लढवावी अशी मागणी देखील मनसे नेत्यांकडून करण्यात आल्याचे बोललं जात आहे. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जवळपास दीड तास ही बैठक पार पडली होती.

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी मनसेच्या नेत्यांची एक समिती तयार केली जाणार आहे. ही समिती त्या-त्या प्रभागाचा आणि तिथल्या उमेदवारांचा आढावा घेईल. या सर्वेक्षणानंतर युतीबाबत समितीचे म्हणणं काय आहे विचारात घेतले जाणार असल्याचे म्हटलं जात आहे.
 

Web Title: MNS Raj Thackeray starts preparations for Mumbai Municipal Corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.