Raj Thackeray : "परक्यांना कळतं पण स्वकीयांना..."; राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक, सरसंघचालकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:44 IST2026-02-24T12:43:31+5:302026-02-24T12:44:10+5:30

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे.

MNS Raj Thackeray Share japani girl video over marathi language and slams RSS chief | Raj Thackeray : "परक्यांना कळतं पण स्वकीयांना..."; राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक, सरसंघचालकांना टोला

Raj Thackeray : "परक्यांना कळतं पण स्वकीयांना..."; राज ठाकरेंनी केलं जपानी तरुणीचं कौतुक, सरसंघचालकांना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मराठी शिकणाऱ्या एका जपानी तरुणीचं भरभरून कौतुक केलं आहे. तरुणीचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी "जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद" असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खोचक टोला लगावला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

"सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही? माहित नाही" असं म्हणत राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात."

"ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात."

"मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेव्हा जेव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही." 

"त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही?  माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो..."
 
"माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद" असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title : राज ठाकरे ने जापानी महिला की प्रशंसा की, RSS प्रमुख की मराठी उदासीनता की आलोचना की

Web Summary : राज ठाकरे ने एक जापानी महिला की मराठी सीखने के लिए प्रशंसा की, और मुंबई में मराठी का उपयोग करने में आरएसएस प्रमुख मोहन भागवत की अनिच्छा की आलोचना की। उन्होंने मराठी को ज्ञान और अवसर की भाषा बनाने का आग्रह किया।

Web Title : Raj Thackeray Praises Japanese Woman, Criticizes RSS Chief's Marathi Apathy

Web Summary : Raj Thackeray lauded a Japanese woman learning Marathi, contrasting it with RSS chief Mohan Bhagwat's reluctance to use Marathi in Mumbai. He urged making Marathi a language of knowledge and opportunity.