CM Devendra Fadnavis Raj Thackeray Meet: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असताना दोघेही एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. अशातच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांच्या मनसे प्रमुखांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. अशातच राज ठाकरे वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एकमेकांना भेटली. राज ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसही काही वेळाने या हॉटेलमध्ये पोहोचले होते. ही राजकीय भेट आहे की नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र दोघांमध्ये तासाभरापासून बैठक सुरु होती असं वृत्त माध्यमांनी दिलं. दुसरीकडे राज ठाकरेंची आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या भेटीनंतर राज ठाकरे बैठकीत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
दरम्यान, महापालिकेत राज ठाकरे यांनी भाजपसोबत युती केल्यास निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत जाण्याची चर्चा आजच्या भेटीवरुन सुरु झाली आहे.