Join us

साहेबांसाठी कायपण! राज ठाकरेंना भेटण्यासाठी 'तो' कोल्हापूर ते मुंबई चालत आला, भेट होताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 19:11 IST

MNS Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी एक कार्यकर्ता चक्क कोल्हापूर ते मुंबई चालत आला.

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याची ‘मनसे’ने जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार आणि ते आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याकडे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान मनसेच्या एका कार्यकर्त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी एक कार्यकर्ता चक्क कोल्हापूर ते मुंबई चालत आला. राज ठाकरेंना भेटताच तो नतमस्तक झाला. राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी शिर्डी येथील प्रमोद आरणे या महाराष्ट्र सैनिकाने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवतीर्थ दादरपर्यंत चालत "पक्षध्वज पायी संकल्प यात्रा" काल पूर्ण केली. 

महाराष्ट्र सैनिक प्रमोद आरणेने राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. त्यांच्या पाया पडला. यावेळी राज यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान, विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर ते कामरा आणि त्यापाठोपाठ रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी या विषयावर ते काय भाष्य करणार, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. राज्यभरातून या मेळाव्यासाठी सुमारे १ लाख मनसैनिक येतील, अशी माहिती मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबईकोल्हापूर